पुणे : पावसाळा सुरू असल्याने पर्यटक गड (Pune News) किल्ल्यांवर, निसर्गाच्या सानिध्यात फिरायला येत असतात. यादरम्यान अनेक धक्कादायक घटना घडतात. यामध्ये काहींना आपला जीवदेखील गमवावा लागतो. अशीच एक घटना (Pune News) एका तरुणाच्या बाबतीत घडली आहे. पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यात असणाऱ्या किल्ले राजगड येथील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय.33) रा. भिवंडी, ठाणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय घडलं नेमके?
वेल्हे तालुक्यातील राजगडावर ठाणे येथून चार पर्यटक फिरण्यासाठी आले होते. सोमवारी रात्री अजय हा किल्यावर असणाऱ्या पद्मावती टाकीत पाणी काढण्यासाठी गेला होता. पाणी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो पाण्याच्या टाकीत पडला. रात्रीचा काळोख असल्याने त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्याचा शोध लागला नाही. रात्र खूप असल्याने कुणाची मदत मिळण्यास अडचणी आल्या. मात्र सकाळी त्याचा मृतदेह पाण्याच्या टाकीत आढळून आला.
अजयच्या जाण्याने त्याच्या मित्रांना मोठा धक्का बसला. अजय हा मित्रांशी आपलेपणाने वागत असे. सर्वांशी त्याचे वागणे चांगले होते. या घटनेमुळे अजयच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच राजगड किल्ला असो वां कोणताही किल्ला असो त्या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.