पुण्यात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील बोपोडी परिसरात घडला. यात पोलीस कर्मचारी समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर पी. सी. शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर हा अपघात होण्याआधीचा समाधान शिंदे यांचा एक फोटो आता समोर आला आहे. कोळी यांनी एका हरवलेल्या मुलीला तिच्या पालकांकडे सुपूर्त केले. तेव्हा त्यांनी हा फोटो काढला होता. हा फोटो त्यांचा अखेरचा फोटो ठरला.
पोलीस कर्मचारी समाधान कोळी आणि पी. सी. शिंदे रविवारी रात्री गस्तेवर होते. त्यावेळी त्यांना रात्री उशिरा खडकी भागातील बस स्टॉपवर एक अकरा वर्षांची मुलगी एकटीच बसल्याचे आढळून आले. या दोघांनी तिची विचारपूस केली. तेव्हा तिने ती पिंपळे सौदागर भागात राहात असल्याचे सांगितले. त्याचबरोबर तिने आपल्या आई-वडिलांचा फोन नंबर त्यांना दिला. त्यानंतर या दोघांनी मुलीच्या आई-वडिलांना संपर्क केला. व सर्व खातर जमा करून या मुलीला तिच्या आई-वडिलांकडे सोपावले. त्यानंतर तसा फोटो पोलीस कॉन्स्टेबल समाधान कोळी आणि पी. सी. शिंदे यांनी पोलिसांच्या गृपवर पोस्ट केला होता. हा फोटो 1 वाजून 7 मिनीटांचा आहे. मुलीला सोपवल्यानंतर हे दोघेही बाईक वरून बोपोडी भागात आले असता 1 वाजून 36 मिनिटांनी अपघात झाला. त्यातच समाधान कोळी यांचा मृत्यू झाला तर पी.सी. शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा फोटो बघून संपूर्ण पोलीस प्रशासनामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.