पुण्यनगरी ही गेल्या काही दिवसांपासून गुन्हे नगरी म्हणून प्रसिद्ध होत आहे. पुण्यात गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असूनही तितकसं यश येताना दिसत नाही. त्यातच आता हे गुन्हेगार स्वतःला बॉलीवूड किंवा हॉलीवुड मधला एखादा हिरो किंवा व्हिलन असल्यासारखं सोशल मीडियावर दाखवतायत. त्यामुळेच सोशल मीडियावर पुण्यातल्या कुख्यात गुंडांसह आता गुन्हेगारीतल्या छोट्या-मोठ्या पंटरनीही धुमाकूळ घातलाय. याच्यात विरोधात पुणे पोलीसही कंबर कसून तयार आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर गुन्हेगारीच्या रिल्स करणं चांगलं महागात पडणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुण्यामध्ये येऊन पदभार स्वीकारल्यानंतर पुण्यातल्या गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांची परेड काढली. गुन्हेगारी कृत्य न करण्याची तंबी देण्यात आली. त्यानंतर काही दिवस पुणे शहर शांत असल्यासारखं वाटत होतं मात्र काही काळातच पुन्हा गुन्हेगारी उफाळून वर आली. त्यातच आणि गुंडांनी सिनेमातले हिरो किंवा व्हिलन असल्यासारखे फोटो, व्हिडिओ त्यावर डॉन बादशाह अशी गाणी आणि अमुक कंपनी तमुक गॅंग असा मजकूर लिहिलेल्या रिल्स व्हायरल करायला सुरुवात केली. या रिल्समुळे सोशल मीडियावर आणि समाजा आपली दहशत निर्माण होते असं समजून आता गुन्हेगारांकडे आकर्षित झालेली अल्पवयीन मूलही अशाच रिल्स बनवू लागलीत.
पुण्यातल्या कुख्यात टोळ्यांच्या म्होरक्यांना पुणे पोलिसांनी दहशत वाजवणाऱ्या रिल्स बंद करण्याचा सज्जड दम दिल्यानंतर त्यांच्या रील्स कमी झाल्या मात्र त्यांचे समर्थक किंवा विरोधक असणाऱ्या 14 ते 23 वयोगटातल्या मुलांच्या रील्स मात्र वाढल्या. पुण्याचे मालक, किंग, बादशहा असा मजकूर टाकून हातात हत्यार घेऊन पोलिसांची भीती न बाळगता रील्स करणाऱ्यांची संख्या देखील वाढली.
अल्पवयीन मुलांच्या रिल्समध्ये मोठ्या गुंडांचे हातात हत्यार घेतलेले, कधी कोणाला धमकावतानाचे, सुनावणीसाठी कोर्टात नेतानाचे, पोलीस व्हॅनमध्ये बसलेले, हातात बेड्या घातलेले, पोलीस अटक करून घेऊन जातानाचे फोटो आणि व्हिडिओ लावले जात आहेत. त्यावर गुन्हेगारीवर आधारित गाणी किंवा डायलॉग लावून स्टेटस स्टोरी टाकल्या जात आहे. त्यावरच आता गुन्हे शाखेची पथक वॉच ठेवून आहेत. अशा रील्स आढळणाऱ्या अकाउंटचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून जनजागृती निर्माण करण्यासाठी माफी मागतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले जाणार आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली आहे.
स्वतःच्या नावासोबत 302, येरवडा रिटर्न, अमुक तमुक कंपनी असं लिहून सोशल मीडिया बरोबरच प्रत्यक्ष आयुष्यात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलांची संख्या जास्त आहे. हीच मुलं पुढे जाऊन आणखी भयानक गुन्हेगारी कृत्य करू शकतात त्यामुळे अशा सगळ्याच गुन्हेगारांना आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आता पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना दणका देण्याचं काम पुणे पोलिसांकडून ऑलरेडी सुरू झालं असून काही गुंडांचे माफी मागताना चे व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत.