पुण्यातून दररोज महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर पुण्यातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका आलिशान सोसायटीतील तरुणाने आपल्या सोसायटीतील एका तरुणीला घरी बोलावून तिच्याबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आता आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पुण्यातील कस्तुरी चौकात असलेल्या एका सोसायटीमध्ये घडली. या सोसायटीतील 24 वर्षीय तरुणीला आरोपीने एसएमएस करून आपल्या घरी बोलावलं. या तरुणाच्या मनात तिच्याविषयी मोठा कट शिजत होता याचा तिला अंदाजही नव्हता. त्यामुळे ही तरुणी त्याच्या घरी पोहोचली. त्यावेळी त्याने तरुणीवर जबरदस्ती करत तिचं चुंबन घेतलं. एवढ्यावरच न थांबता त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्नही केला. त्यामुळे घाबरलेल्या या तरुणीला काय करावं काहीच सुचत नव्हतं. भयभीत झालेली ही तरुणी या आरोपीच्या घरातील वॉशिंग मशीन च्या बाजूला एका कोपऱ्यात बसून होती. दरम्यान मध्यरात्री दोन वाजता आपली मुलगी घरातून गायब झाली असल्याचं तरुणीच्या कुटुंबीयांना लक्षात आलं.
या तरुणीच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. सोसायटीतील सर्व सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यामध्ये ही तरुणी सोसायटीतून बाहेर गेली नसल्याचं आढळलं. त्यामुळे ही तरुणी सोसायटीतच कुठेतरी असणार हे लक्षात घेऊन सोसायटी तिची शोधा शोध सुरू झाली. सर्व घरांमध्ये देखील तरुणीचा शोध घेण्यात आला. मात्र ही तरुणी कुठेही सापडली नाही. मात्र ज्यावेळी कुटुंबीय या आरोपीच्या घरी तिला शोधण्यासाठी गेले त्यावेळी उडवा उडवीची उत्तर देण्यात आली. यानंतर आरोपीच्या घरात जाऊन शोधा शोध केली असता ही तरुणी घाबरलेल्या अवस्थेत कोपऱ्यात बसलेली आढळली. तिच्या शरीरावर ओरबडल्याच्या खुणा देखील होत्या. त्यामुळे लागलीच तिला ससून रुग्णालय दाखल करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणामुळे ओळखीच्या लोकांकडून महिलांवर होणारे अत्याचार किती गंभीर स्वरूपाचे आहेत आणि याच्यामध्ये वाढ होत आहे हे लक्षात येतं. त्यामुळेच अशा आरोपींपासून महिलांनी स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.