शाळा म्हणजेच विद्यार्थ्यांचं दुसरं घर.. पण याच शाळेत विद्यार्थी सुरक्षित आहेत का ? या प्रश्नाचे उत्तर सध्याच्या घटना बघता नाही असंच असेल. कधी मुलींवर शाळेत होणारे अत्याचार असतील तर कधी शिक्षकांकडून होणारी बेदम मारहाण असेल निष्पाप विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये शिकार बनवलं जातय. आणि अशीच माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमधील शाळेत घडली. शाळेच्या संचालकानेच दुसरीतील निष्पाप चिमुकल्याचा अंधश्रद्धेच्या पायात जीव घेतला. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया…
डी.एल. पब्लिक स्कूल असं या शाळेचं नाव.. जसोधन सिंह नावाच्या व्यक्तीच्या मालकीची ही शाळा. जसोधन हा अंधश्रद्धा, जादूटोणा, तंत्र मंत्र यावर विश्वास ठेवून यासंदर्भातली कृत्य करत होता. त्याने त्याचा मुलगा व शाळेचा संचालक दिनेश बघेल याच्या मदतीने शाळेच्या प्रगतीसाठी नरबळी द्यायचं ठरवलं. आपण एका विद्यार्थ्याचा नरबळी देऊ जेणेकरून शाळेची आणि आपल्या कुटुंबांची भरभराट होईल. असं जसोधनने या दोघांना सांगितलं. आणि लागलीच नरबळी देण्याचा कट शिजला. आणि या नरबळीची शिकार ठरला तो अवघ्या दुसरीत शिकणारा कृतार्थ कुशवाह हा चिमुकला..
कृतार्थचा नरबळी द्यायचा कट या तिघांनी रचला, शाळेतील आणखी दोन शिक्षकांनी त्यांना मदत केली. मात्र हा नरबळी द्यायच्या आधीच त्यांनी कृतार्थ ला संपवलं.. शाळेच्या होस्टेलमधून शिक्षक रामप्रकाश सोळंकी, दिनेश बघेल आणि जसोधन सिंह यांनी झोपलेल्या कृतार्थचं अपहरण केलं. नरबळी देण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी त्याला घेऊन जाताना कृतार्थ ला जाग आली. तो रडू लागला ज्यामुळे हे आरोपी घाबरले. कृतार्थने आपली सुटका करून पळण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडे विनवणी केली मात्र तरीही चिमुकल्याला पाहून या नराधमांना पाझर फुटला नाही. त्यांनी कृतार्थचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर कृतार्थ ला बरं नसल्याने हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी त्याच्या पालकांना दिली आणि पालक शाळेत पोहोचायच्या आधीच कृतार्थ चा मृतदेह घेऊन हे आरोपी फरार झाले. पालकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं. आणि संपूर्ण देश या घटनेने हादरून गेला.
याप्रकरणी शाळेचा मालक जसोधन सिंह व त्याचा मुलगा, शाळेचा संचालक दिनेश बघेल, मुख्याध्यापक लक्ष्मण सिंह आणि शाळेतील दोन शिक्षक रामप्रकाश सोळंकी, वीरपाल सिंह या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भलीमोठी चळवळ देशात सुरू असताना दुसरीकडे अजूनही या अंधश्रद्धेच्या विळख्यात देशातील बहुसंख्य वर्ग अजूनही अडकलेला दिसतोय. अंधश्रद्धेच्या बेड्यांमध्ये जखडलेला भारत महासत्ता होईल का हाच प्रश्न इथल्या प्रत्येक सजग नागरिकाला पडलाय.