Porsche car accident : शिक्षण संस्थांनी प्रवेश नाकारला; अल्पवयीन आरोपीच्या अडचणीत वाढ

220 0

पुण्यातील कल्याणी नगर मध्ये झालेल्या पोर्शे कार अपघाताने पुणेकरांबरोबरच आरोपी अग्रवाल यांच्या कुटुंबालाही हादरवून टाकलं. हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ठ असून सध्या अल्पवयीन कारचालक वेदांत अग्रवाल याला सामाजिक जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. या अल्पवयीन कार चालकाला आता कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील पोर्शे कार अपघातात अल्पवयीन कार चालकाने बेधुंद पद्धतीने कार चालवत दोन निष्पाप तरुणांचा जीव घेतला. आयटीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीला व तरुणाला यामध्ये आपले जीव गमवावे लागले. त्यामुळे या अल्पवयीन आरोपीवर प्रौढ म्हणजेच सज्ञान म्हणून खटला चालवण्यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता. या अर्जावर बाल न्याय मंडळात सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी आरोपीच्या वकिलांनी अल्पवयीन आरोपीला शिक्षण घेण्यात अडचणी निर्माण होत असल्याचं सांगितलं.

हा मुलगा नुकताच बारावी पास झाला असून त्याला दिल्लीतील एका नामांकित महाविद्यालयात बीबीए च्या शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे. मात्र या महाविद्यालयाने मुलाचा प्रवेश नाकारला आहे. ज्यामुळे त्याचा शैक्षणिक हक्क हिरावला जात आहे. त्यामुळेच या मुलाचे शिक्षण अबाधित राहावे अशी मागणी त्याच्या वकिलांनी बाल न्याय मंडळाकडे केली. तर यावर या मुलाच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येऊ नयेत, अशी भूमिका विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी घेतली.

सरकारी वकिलांच्या या भूमिकेचा बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षांनी कौतुक केलं. मात्र या संदर्भात बचाव पक्षाकडून कोणताही लेखी अर्ज प्राप्त झाला नसल्याने या सुनावणी मध्ये मुलाचे शिक्षणाच्या संदर्भातील कोणताही आदेश देण्यात आला नाही.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide