पुण्यातील दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीला रोखणे पोलिसांपुढील आव्हान बनले आहे. त्यातच आता पोलिसांचाच खबरी असल्याच्या संशयावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेत मोहम्मद प्यारे शेख (वय २७, रा. अश्रफनगर, कोंढवा) नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये घडली. मोहम्मद शेख यांनी याप्रकरणी नोंद केलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने अरबाज उर्फ लॅब याच्यासह त्याच्या इतर तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका गुन्हा मध्ये पोलीस तपास करत असताना आरोपी अरबाज याच्या साथीदाराचे घर मोहम्मद याने पोलिसांना दाखवले असल्याचा संशय आरोपींना होता. याचाच राग अनेक दिवसांपासून त्यांच्या मनात होता. याच रागापोटी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मोहम्मद शेख एकटाच कोणार्क पुरम सोसायटीच्या येथून जात होता. तेव्हा अरबाज आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. ‘तू तबरेजचं घर पोलिसांना का दाखवलंस?,’ अशी विचारणा त्याच्याकडे केली व थेट मोहम्मद वर कोयत्याने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्याच्या आधारे पुढील तपास पोलीस करत आहेत.