‘आमच्या भाईच्या खुनाचा बदला घेणारच’ म्हणत एकावर केले वार; पुण्यातील येरवड्यातील धक्कादायक घटना
एकाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने दुसरा एका तरुणावर कोयत्याने वार वाहनांची तोडफोड करून येरवडा परिसरात दहशत माजविल्याची घटना घडली. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली असून या प्रकरणी चौघांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी प्रवीण भगवान कांबळे (वय ३६, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सतीश ऊर्फ गोट्या चंद्रकांत मोरे (रा. पाषाण) याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै रोजी मध्यरात्री येरवडा परिसरात सुधीर गवस (वय २५, रा. जयप्रकाश नगर, येरवडा) याचा खून झाला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी या टोळक्याने परिसरात दहशत माजवली.
‘आमच्या सुधीर भाई च्या खुनाचा बदला घेणारच, जो मध्ये येईल त्याला संपवून टाकू’, असे म्हणत टोळक्याने कोयत्याने धुडगूस घालायला सुरुवात केली. रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी आणि रिक्षांची तोडफोड केली. या प्रकरणातील फिर्यादी असलेले प्रवीण कांबळे सोमवारी मध्यरात्री माऊली चौक ते महिंद्रा सोसायटीदरम्यान चालण्यासाठी बाहेर पडले असता त्यांच्यावर कोयत्याने वार केले. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सतीश मोरे नावाच्या संशयीताला अटक केली आहे.