मुंबईतील राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (NITESH RANE) यांच्या शासकीय बंगल्याबाहेर बेवारस बॅग (UNCLAIMED BAG)आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा तात्काळ सतर्क झाल्या असून बॉम्ब शोधक पथकाकडून बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी ये-जा करण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली होती.
बॉम्ब शोधक पथकाच्या तपासणीनंतर बॅगमध्ये कोणतीही संशयास्पद अथवा घातक वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी सुटकेचा श्वास घेतला.
यानंतर माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे(NITESH RANE)यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली. “मला जर आधीच या बॅगविषयी माहिती असती, तर ज्यांनी ती बॅग ठेवली त्यांनाच त्या बॅगमध्ये घालून घरी पाठवले असते. अशा प्रकारच्या भानगडीत पडू नका,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.