भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांना नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणात जाणून-बुजून वाचवलं जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत कोण कोणती कारवाई झाली आहे, आणि कोणती कारवाई करण्यात येणार आहे याबाबतची माहिती नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेत दिली.
नागपूर पोलीस उपायुक्त म्हणाले, ‘नागपूर ‘हिट अँड रन’ प्रकरणातील ती ऑडी कार संकेत बावनकुळे यांच्याच नावावर असून तेही अपघातावेळी कारमध्ये होते. हे स्पष्ट झाले आहे. मात्र ते गाडी चालवत नसून अर्जुन हावरे हा गाडी चालवत होता. तर त्यांच्या बाजूला संकेत बावनकुळे बसले होते. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आमच्यावर कोणताही राजकीय दबाव नाही.’
अपघात कसा झाला?
एका हॉटेलमध्ये हे सर्वजण जेवण करायला गेले होते. तिथून घरी निघताना अपघात झाला. हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाता वेळी गाडीचा वेग नेमका किती होता याची तपासणी करण्यासाठी ऑडी शोरूम मधून टेक्निशियनला बोलावून त्याच्या मदतीने तपास केला जाईल. संकेत बावनकुळे यांना सोडून इतर दोघांनीही म्हणजेच अर्जुन हावरे आणि रोनित चित्तमवार यांनी मद्यप्राशन केले होते. संकेत बावनकुळे यांचा मद्य प्रशान रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.’, अशी माहिती त्यांनी दिली.
संकेतवर गुन्हा का नाही ?
या प्रकरणात संकेत बावनकुळे यांना वाचवले जात असल्याचा आरोप वारंवार होत असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही याचं उत्तरही पोलिसांनी दिलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत केवळ कार चालकावर गुन्हा दाखल केलेला आहे. इतर दोघांवरही म्हणजेच रोनित आणि संकेत दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेले नाहीत. पोलीस तपासामध्ये या गाडीचे सर्व कागदपत्र आहेत का ? एकाकडे परवाना आहे का ? संकेत ने ही गाडी अर्जुन ला चालवायला का दिली याचा तपास केला जाईल. त्यानंतर दोषी आढळलेल्या इतरांवर गुन्हे दाखल केले जातील. अशी देखील माहिती नागपूर पोलिसांकडून देण्यात आली आहे.