गुन्ह्याबाबत माहिती दिल्याच्या रागातून दोन तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. हे तरुणाचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकून आरोपींनी पळ काढला. ही घटना हडपसर भागातील रामटेकडी परिसरात घडली असून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत.
पुण्यातील हडपसर मधील रामटेकडी परिसरात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. फरहान अब्दुल रज्जाक शेख (वय 33, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सिद्धेश्वर दिलीप चव्हाण, प्रसाद उर्फ भैय्या विजय कांबळे (दोघे रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरहान शेख हा वेल्डिंगचे काम करायचा. त्याची आणि आरोपी सिद्धेश्वर याची आधीपासून ओळख होती. वर्षभरापूर्वी आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी तो कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र हा गुन्हा फरहानमुळेच दाखल झाला असल्याचा राग सिद्धेश्वरला होता. दोन महिन्यांपूर्वी सिद्धेश्वर ची जामिनावर सुटका झाली. त्यावेळी बाहेर घेताच त्याने रागाच्या भरात फरहानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकी बद्दल फरहानने त्याचा भाऊ फरीद याला कल्पना दिली होती. पुढे सिद्धेश्वर आणि सह आरोपी भैय्या या दोघांनी शनिवारी मध्यरात्री फरहानला गोड बोलून दारू पिण्यास बोलावले. त्यानंतर त्याला रामटेकडी परिसरातील निर्जन स्थळी नेले. दोघांनी मिळून लोखंडी गजाने त्याला बेदम मारहाण केली. या गंभीर मारहाणीत फरहान चा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर या दोघांनी फरांचा मृतदेह जवळच असलेल्या रेल्वे रुळावर छिन्नविछिन्न अवस्थेत टाकून दिला.
आश्चर्याची बाब म्हणजे मृतदेह टाकून दिल्यानंतर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हे दोघेही वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि स्वतःच गुन्ह्याची कबुली देखील दिली. मात्र पुन्हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण हडपसर पोलीस ठाण्याकडे गेले. याप्रकरणी फरहाचा भाऊ फरीद याला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावण्यात आले. फरीदने मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांना याआधी धमकी दिल्याबद्दल देखील सांगितले. त्यानंतर या दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली असून गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गीते या प्रकरणाचा सविस्तर तपास करत आहेत.