पुणे- पती-पत्नीच्या वादातून जावयाने सासऱ्यावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला.
अशोक कुडले असे खून करणाऱ्या जावयाचे नाव असून रमेश रामचंद्र उत्तरकर (वय ६५) असे मृत्युमुखी पडलेल्या सासऱ्याचे नाव आहे. खुनानंतर जावयाने हातात चाकू घेऊन थेट पोलीस ठाणे गाठून खुनाची कबुली दिली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अशोक कुडले याचा रमेश उत्तरकर यांच्या मुलीसोबत विवाह झाला होता. गेल्या काही वर्षांपासून अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू होता. या वादातून पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यांच्यातील वाद न्यायप्रविष्ठ आहे. वाद झाल्याने पत्नी नांदायला येत नव्हती. याचाच राग अशोक कुडले याच्या मनात होता.
उत्तरकर त्यांच्या कपड्याच्या दुकानात बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बसले होते. या ठिकाणी अशोक कुडले आला. काहीवेळ या दोघांमध्ये वाद झाला. माझ्या पत्नीला सासरी पाठवा असे कुडले सांगत होता. उत्तरकर यांनी त्याला नकार देताच अशोक याने हातातील चाकूने उत्तरकर यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत उत्तरकर मृत्युमुखी पडले.