पुणे – प्रेयसीचे मॅनेजरबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून प्रियकराने मॅनेजरला जाब विचारला. त्यावरून प्रेयसीने तिच्या मामाला बोलावून प्रियकराला मारहाण केली. त्यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या मित्रालाच आपले प्राण गमवावे लागले. ही घटना लोकमान्यनगर पोस्ट ऑफिससमोर शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 5 ते 7 जणांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश गायकवाड ( वय २१ , रा . दत्तवाडी ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 22 वर्षीय तरूणाचे एका तरुणीवर प्रेम होते. ही तरुणी ज्याठिकाणी नोकरीला आहे तेथील मॅनेजरबरोबर तिचे प्रेम जुळल्याचा फिर्यादीला संशय होता. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास या मॅनेजरने या तरुणीला लोकमान्यनगर येथील पोस्ट ऑफिससमोर मोटारसायकलवरुन सोडले. त्यावेळी फिर्यादी तरुण त्यांचा पाठलाग करत या ठिकाणी पोहोचला. फिर्यादीने मॅनेजरला अडवून तुमच्या दोघांचे संबंध आहेत का अशी विचारणा केली. त्यावेळी दोघांनीही आमच्यात काही नाही , असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांच्यामध्ये भांडणे लागली.
तरुणीने आपल्या मामाला त्या ठिकाणी बोलावून घेतले. मामा आणि इतर चार ते पाच जण त्याठिकाणी आले आणि फिर्यादी तरुणाला मारहाण करू लागले. त्यानंतर मामांनी फिर्यादीच्या अंगावर तलवारीने वार केले. आपल्या मित्राला मारत असल्याचे पाहून फिर्यादीचा मित्र गणेश त्याठिकाणी भांडणे सोडवण्यासाठी आला असता आरोपींनी गणेशच्या मानेवर तलवारीने वार केले. यामध्ये गणेशचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल करून आरोपींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.