मुंबई : रविवारी रात्री मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या (Mumbai Crime News) हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पवईमध्ये एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापड्याने इमारतीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारवाह रोडवर असलेल्या एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
मृत तरुणी एअर होस्टेस असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.तिची नुकतीच एअर होस्टेस म्हणून निवड झाली होती. मात्र ही मृत तरुणी कोण आहे, ती फ्लॅटमध्ये कधीपासून एकटीच राहत होती आणि तिच्या हत्येमागचे कारण काय? याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत.