सोलापूर : सोलापूरमधून एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती- पत्नींच्या भांडणात लहानग्या चिमुरड्याना आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना सोलापूर जिल्ह्यातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या महिलेने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्यानंतर स्वतःदेखील आत्महत्या केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ज्योती सुहास चव्हाण असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अथर्व आणि आर्या या दोन चिमुकल्यांचे तोंड उशीने दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. विजापूर रस्त्यावरील राजस्व नगरात ज्योती तिच्या पती आणि मुलांसह राहत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी त्यांनी अधिक चौकशी केली असता पती पत्नीमध्ये कौटुंबिक वाद होत असल्याची माहिती समोर आली त्यामुळे यातूनच हि घटना घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी ज्योतीसह तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.