राज्यात दररोज मोठ्या संख्येने अपघात होत असून यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मुंबईच्या मालाडमध्येही भरधाव कारने घरी परतणाऱ्या महिलेला धडक दिली. यात या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मयत महिला ही मेहंदीच्या क्लासला गेली होती. तिथून घरी परतत असताना हा अपघात झाला. ही महिला क्लास संपून पायी जात असताना तिला मागून आलेल्या कारने जोरदार धडक दिली. त्यात ही महिला कारखाली येऊन चिरडली गेली. त्यानंतरही ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. त्याने महिलेला डिव्हायडर पर्यंत फरफटत नेले.
हा अपघात घडतात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली. या ड्रायव्हरला बेदम मारहाण केली. त्यानंतर ड्रायव्हरने महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हर हा मर्चंट नेव्हीचा कर्मचारी आहे. त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर मयत महिलेच्या पश्चात पती आणि दोन लहान मुली आहेत. त्यामुळे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.