विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या तरुणाने रेल्वे समोर उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना परभणीमध्ये घडली आहे. माणिक कारभारी खोसे असा आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा वाजता घडली.
माणिक खोसे हा तरुण सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव शहरातील एका कारखान्यात नोकरी करत होता. त्याचं एका महिलेवर प्रेम होतं. ही महिला विवाहित असून तिच्या पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी आली होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले. हे प्रेमसंबंध अगदी लग्नापर्यंत पोहोचले होते. या दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण कुटुंबियांनी विरोध केल्यानं हा तरुण नैराश्यात गेला. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तिच्याशी लग्न होऊ शकत नाही, हा विचार त्याला खाऊ लागला. त्यातूनच तो 12 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता सेलू-सातोना रेल्वे स्टेशनवर पोचला. तिथून त्याने काही मित्रांना सोशल मीडियावरून आपण आत्महत्या करत असल्याचं व त्यामागचं कारण सांगितलं. आणि धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवलं. घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मात्र आता त्याच्यावर जाण्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.