GANGWAR IN PUNE: सुसंस्कृत कोथरूडमध्ये गुंडांच्या टोळ्या आणि गुन्हेगारी का वाढली ?

GANGWAR IN PUNE: सुसंस्कृत कोथरूडमध्ये गुंडांच्या टोळ्या आणि गुन्हेगारी का वाढली ?

76 0

आधी कोथरूड म्हंटलं की डोळ्यासमोर यायच्या उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था, सुसंस्कृत अस्सल पुणेकर, मोठमोठे नेते, सेलिब्रिटी, वैचारिक व्यक्तिमत्वांचं वास्तव्य आणि शांत परिसर… मात्र आता कोथरूड गुंडांच्या टोळ्यांचं माहेरघर, गुन्हेगारांचा अड्डा आणि असुरक्षित- भयभीत सर्वसामान्यांचा परिसर बनलंय. घायवळ, मारणे, मोहोळ, बोडके, कुडले, धर्मे ‌अशा असंख्य टोळ्यांनी (GANGWAR IN PUNE) आपलं बस्तान कोथरूडमध्येच का बसवलंय ? कधीकाळी कोथरूड हा वैचारिक आणि सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून प्रसिद्ध होता. मात्र सध्या याच कोथरूडमध्ये कुख्यात गुंडांच्या असंख्य टोळ्या सक्रिय आहेत. ज्यामुळे कधीकाळी शांत असलेलं कोथरूड आता प्रचंड अशांत झालंय.

कोथरूड आणि टोळ्या

* मोहोळ टोळी- संदीप मोहोळ आणि शरद मोहोळ यांच्या गुन्हेगारी कारवायांमधून जन्माला आलेली मोहोळ टोळी.. या टोळीचे वर्चस्व कोथरूड, कर्वेनगर, कात्रज आणि मुळशी सारख्या काही ग्रामीण भागात दिसून येतं. खंडणी, खून, खूनाचे प्रयत्न, जमिनीच्या व्यवहारात बेकायदेशीर हस्तक्षेप असे अनेक गुन्हे या टोळीच्या नावावर आहेत. सुरुवातीला संदीप मोहोळच्या मृत्यू नंतर ही टोळी संपेल असं वाटलं मात्र शरद मोहोळ यानं टोळीची सूत्र हाती घेतली. आणि पुन्हा दहशत माजवायला सुरुवात केली. मात्र मागच्या वर्षी शरद मोहोळचा कोथरूडच्या सुतारदरा परिसरात खून करण्यात आला. सध्या या टोळीला म्होरक्या नसला तरीही टोळी ऍक्टिव्ह असल्याचं दिसतं.

*मारणे टोळी- गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. 90 च्या दशकापासून त्याने गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. सुरुवातीला खंडणी, सुपारी, जमीन व्यवहारात हस्तक्षेप अशा गुन्ह्यांतून त्याने आपली टोळी निर्माण केली. त्यानंतर अनेक खून, खूनाचे प्रयत्न, खंडणी आणि इतर गंभीर गुन्हे या टोळीवर आहेत. ही टोळी देखील कोथरूड, कात्रज, वडगाव बुद्रुक, सिंहगड रोड परिसरात जास्त ऍक्टिव्ह आहे. गजा मारणे हा महाराज म्हणून देखील ओळखला जात असून त्याच्या दहशतीमुळे आकर्षित होऊन शेकडो गुंड या टोळीचा भाग झाले आहेत.

*घायवळ टोळी- निलेश घायवळ उर्फ बॉस हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. खंडणी, मारहाण, जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहार करत घायवळ टोळी उदयास आली. ही टोळी देखील मुख्यतः कोथरूड, वडगाव, कर्वेनगर, कात्रज भागात सक्रिय आहे. 2000 च्या दशकापासून निलेश घायवळ हा स्वतः गुन्हेगारी कारवाया करत असून त्याच्या टोळीचा मोहोळ आणि मारणे गॅंग बरोबर अनेकदा संघर्ष झालाय. या टोळीवर 30 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून काल देखील याच टोळीतील गुंडांनी गाडीला जागा न दिल्याच्या रागातून एका तरुणावर गोळीबार केला. तर दुसऱ्यावर कोयत्याने वार करून हे आरोपी पसार झाले.

*बोडके टोळी- कमलाकर किसन बोडके उर्फ बाबा बोडके हा या टोळीचा म्होरक्या आहे. 90 च्या दशकापासून गुन्हेगारीत सक्रिय असून खंडणी, मारहाण, वसुली, जागांवर आणि घरांवर बेकायदेशीर ताबा मारणे, असे अनेक गुन्हे या टोळीवर आहेत. ही टोळी विशेषतः विश्रांतवाडी, शिवाजीनगर, कात्रज, मुंढवा, हडपसर या भागात सक्रिय असली तरी कोथरूड कर्वेनगर भागातही या टोळीने दहशत माजवली आहे.

या टोळीच्या प्रतिस्पर्धी टोळ्या कोथरूड, कर्वेनगरमध्ये जास्त सक्रिय असल्यानं त्या परिसरात ही टोळीने गुन्हेगारी कारवाया केल्या आहेत.

टोळ्यांचा केंद्रबिंदू कोथरूडच का ?

मारणे, बोडके, मोहोळ, घायवळ या टोळ्यांबरोबरच कोथरूडमध्ये कुडले टोळी, धर्मे टोळी यासारख्या अनेक लहान मोठ्या टोळ्या सक्रिय आहेत. पोलिसांनी वेळोवेळी या टोळ्यांवर कारवाया करूनही टोळ्यांची दहशत काही केल्या कमी होत नसल्याचं दिसतंय. मात्र या सर्व टोळ्यांचा केंद्रबिंदू कोथरूडच का या प्रश्नाची अनेक उत्तरही आहेत.

पुण्यातील पेठांनंतर कोथरूड हे पुण्यातील सर्वात वेगानं वाढलेलं उपनगर आहे. बाहेरून आलेले विद्यार्थ्यांचे, कामगारांचे लोंढे या भागात राहण्यास इच्छुक असतात. त्यामुळे गेल्या दोन दशकांमध्ये या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढली. लोकसंख्या वाढल्याने अर्थातच शिक्षण, IT पार्क, विविध बिझनेस आणि कन्स्ट्रक्शन साईटही वाढल्या. त्यामुळे याच भागांमध्ये वास्तव्य करून खंडणी, हप्ते वसुली करणं, दहशत माजवणं गुन्हेगारांना सोपं झालं. बाहेरून आलेल्या लोकांची संख्या जास्त असल्याने टोळ्यांमध्ये नव्या गुंडांची भरती सहज होते. वर्दळ जास्त असल्यामुळे गुन्हे करून लपून बसणही शक्य होतं. शिक्षणासाठी आलेल्या तरुणांकडून पैशांच्या बदल्यात गुन्हे करून घेणंही मोठ्या गुन्हेगारांना सहज जमतं. त्याचबरोबर बहुतांश टोळ्यांचे प्रमुख आणि अनेक कुख्यात गुंड हे मूळचे मुळशी भागातील असल्यानं ग्रामीण भागाला शहराशी जोडणारा जवळचा परिसर म्हणून कोथरूडला प्राधान्य दिलं गेलं. त्याचबरोबर अनेक टोळीप्रमुखच कोथरूडमध्ये वास्तव्याला असल्यानं त्यांनी याच परिसरात टोळ्या वाढवल्या आणि पोसल्या आहेत. कोथरूडपासून शहरी भाग आणि ग्रामीण भाग हे दोन्ही जवळ असल्यानं एकाच वेळी दोन्ही भागांवर वर्चस्व राखता येतं. त्यामुळेच अनेक टोळ्यांनी आपलं बस्तान कोथरूडमध्येच बसवल्याचं आढळतं.

राजकीय आश्रय

कोथरूडमध्ये गुन्हेगारी टोळ्या वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे या परिसरात मिळणारा राजकीय आश्रय.. या परिसरातील गुन्हेगारांचे राजकीय पक्षांशी आणि अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे राज आश्रय मिळत असल्यानं कोथरूड मध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे. मात्र या वाढत्या गुन्हेगारीत पिचला जातोय तो सर्वसामान्य कोथरूडकर.. त्यामुळेच अशांत झालेलं कोथरूड शांत करण्याचं आव्हान हे पुणे पोलिसांपुढे आहे.

 

Share This News
error: Content is protected !!