Kondhwa Pune ATS Raid: पुण्यातील कोंढवा परिसरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS), पुणे शहर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणांनी (Kondhwa Pune ATS Raid) मध्यरात्रीपासून एक मोठी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. या अचानक झालेल्या कारवाईमुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात खळबळ उडाली आहे. विशेषतः या भागात २००८ साली इंडियन मुजाहिदीन (IM) या दहशतवादी संघटनेचा नियंत्रण कक्ष उद्ध्वस्त करण्यात आला होता, त्यामुळे कोंढवा परिसर पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या केंद्रस्थानी आला आहे.
कोंढवा परिसरात १८ ठिकाणी छापे?
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एटीएस’, पुणे पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांचे (Kondhwa Pune ATS Raid) जवान कोंढवा परिसरातील तब्बल १८ ठिकाणी एकाच वेळी शोध घेत आहेत. या ठिकाणांमध्ये विशेषतः अशोका मेव्स सोसायटीचा समावेश आहे, जिथे पूर्वी ‘इंडियन मुजाहिदीन’चे अतिरेकी तळ ठोकून होते. सध्या या संपूर्ण भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रस्त्यांवर पोलिसांची गस्त वाढली असून काही भागांतील वाहतूक व नागरिकांची ये-जा थांबवण्यात आली आहे. सुमारे पाचशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही कारवाई बुधवारी मध्यरात्रीनंतर सुरू झाली असून गुरुवारी दुपारपर्यंत ती सुरूच होती.
NILESH GHAIWAL UPDATE: कुख्यात गुंड निलेश घायवळला कोणत्या नेत्यांचा राजकीय आश्रय ?
काय आहे अपडेट?
या शोध मोहिमेदरम्यान तपास पथकांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर सध्या वेगवेगळ्या ठिकाणी कसून चौकशी सुरू आहे. ताब्यात (Kondhwa Pune ATS Raid) घेतलेल्या व्यक्तींची ओळख किंवा नेमके कोणते कारण या कारवाईमागे आहे, याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी पूर्णपणे गोपनीयता पाळली आहे. कारवाईच्या ठिकाणी संशयित वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे, परंतु त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. या कारवाईचा उद्देश संभाव्य दहशतवादी नेटवर्कचा छडा लावणे आणि पूर्वनियोजित प्रतिबंधात्मक कारवाई करणे हा असल्याचे सांगितले जात आहे. दहशतवादी कारवाया किंवा समाजविघातक कृत्ये करण्यासाठी निधी पुरवणाऱ्यांवर (Terror Funding) देखील लक्ष केंद्रित केले जात असल्याचा संशय आहे. कोंढवा हा परिसर पूर्वी देखील अशा संवेदनशील कारवायांसाठी चर्चेत राहिला असल्याने या वेळेच्या ऑपरेशनकडे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांचे बारकाईने लक्ष लागले आहे.
YERWADA POLICE STATION: येरवड्यात भरदिवसा घरात घुसून आई आणि मुलावर तलवारीने वार
पुणे शहर पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना केवळ इतकीच माहिती दिली आहे की, हे राज्य आणि केंद्रीय सुरक्षा संस्थांचे समन्वित ऑपरेशन आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण शोध मोहीम संपल्यावरच या कारवाईचा तपशील जाहीर केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी शांतता राखून तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोंढवा येथील या रात्रीच्या छाप्यांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण यातून देशाच्या सुरक्षेसाठी घातक ठरू शकणाऱ्या अनेक गोष्टींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.