कोलकत्ता बलात्कार प्रकरण | रेड लाईट एरियात गेला, मैत्रिणीकडून न्यूड फोटो मागवले मग महिला डॉक्टरवर अत्याचार केले… आरोपीच्या पॉलीग्राफ टेस्ट मधून समोर आला संपूर्ण घटनाक्रम
कोलकत्ता महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. हा त्यातच या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याने आधी हा गुन्हा कबूल केला होता मात्र नंतर त्याने आपल्याला या प्रकरणात गोवले जात असल्याचा आरोप केला. त्याने आपली पॉलीग्राफ टेस्ट करा, असे कोर्टात सांगितले देखील होते. सीबीआयला देखील या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पॉलीग्राफ टेस्ट करणे गरजेचे होते. आणि अखेर या आरोपीची आता पॉलीग्राफ टेस्ट झाली असून या टेस्ट मधून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
या पॉलीग्राफ टेस्ट मधून मुख्य आरोपी संजय रॉयने त्याच्या त्या रात्रीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. हा घटनाक्रम ऐकून प्रत्येकालाच चीड आल्याशिवाय राहणार नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपी संजय रॉय त्याने पॉलीग्राफ टेस्टमध्ये सांगितले की, आरजी कर रुग्णालयात त्याचा मित्र सौरभ याचा भाऊ दाखल होता. त्याला पाहाण्यासाठीच दोघे रुग्णालयात गेले होते. घटना घडलेल्या रात्री सव्वा अकरा वाजता संजय आणि त्याचा मित्र सौरभ हे दोघे दारू पिण्याच्या इराद्याने रुग्णालयातून बाहेर पडले. रुग्णालयापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 5 Point नावाच्या दुकानातून दोघांनी दारू खरेदी केली. रस्त्यावरच उभा राहून दारू प्यायली. त्यानंतर या दोघांनी कोलकत्यातील सोनागाछी नावाच्या रेड लाईट एरिया मध्ये जाण्याचे ठरवले. हे दोघेही बाईक वरून त्या ठिकाणी पोहोचले मात्र त्या ठिकाणी त्यांना जे हवे होते ते मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी कोलकत्याच्या दक्षिण भागात असलेल्या चेतला नावाच्या रेड लाईट मध्ये जाण्याचे ठरवले. ही दोन्ही ठिकाणी एकमेकांपासून तब्बल 15 किलोमीटर दूर आहेत. या दोघांनी या 15 किलोमीटरच्या अंतरामध्ये देखील रस्त्यावर दिसणाऱ्या मुलींची छेड काढली. मुलींना त्रास देत देत हे दोघे त्या ठिकाणी पोहोचले. हा सगळा प्रकार देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तिथे पोहोचल्यानंतर फक्त सौरभनेच देहविक्री करणाऱ्या महिलेबरोबर शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी बाहेर बसलेल्या आरोपी संजयने आपल्या गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल केला. तिला न्यूड फोटो देखील पाठवायला सांगितले. तिने देखील ते पाठवले. काही वेळानंतर दोघेही रुग्णालयात परतले.
सौरभ आपल्या भावाला भेटायला गेला आणि संजयला घरी जायला सांगितले. काही वेळात सौरभ रॅपिडो बुक करून घरी गेला. त्यानंतर साडेतीन वाजण्याच्या सुमारास संजय रॉय आरजी कर रुग्णालयात गेला. चौथ्या मजल्यावरील ट्रॉमा. सेंटरच्या ऑपरेशन रूममध्ये जाऊन त्याने काहीतरी शोधले. तिथून खाली येऊन तिसऱ्या मजल्यावर असलेल्या सेमिनार हॉलच्या बाहेरच्या पॅसेज मध्ये तो दिसला. तिथे देखील संजय रॉय काहीतरी शोधत होता.
पुढे संजय रॉय म्हणाला की, रुग्णालयात फिरत असताना तो सेमिनार हॉलमध्ये गेला. त्यावेळी त्याला पीडित महिला डॉक्टर झोपलेली दिसली. त्याने थेट तिचे तोंड आणि गळा दाबला. तिने काही वेळ प्रतिकार केला पण नंतर ती बेशुद्ध झाली. त्यानंतर संजय रॉयने तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर हत्या केली आणि तिथून पसार झाला. मात्र जाताना त्याच्या गळ्यातले ब्लूटूथ हेडफोन तिथेच राहिले. ज्यामुळे पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला.
आरोपीने सांगितलेला हा संपूर्ण घटनाक्रम ऐकल्यानंतर प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. अतिशय निर्घुणपणे या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरून निघाला. दरम्यान या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.