कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये (Kolhapur News) दुचाकीवरून मामाकडे निघालेल्या भाच्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील इंगळी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक देऊन फरफटत नेल्यामुळे तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद सुनील बुद्रुक (वय 20 वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विद्यार्थी संघटनेचा वाळवा तालुका अध्यक्ष होता. या अपघातात हर्षदचा मित्र सुजल रामचंद्र बागणे हादेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काय घडले नेमके?
कोल्हापुरातील पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाट्याजवळ हा अपघात झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास हर्षद सुनील बुद्रुक (वय वर्ष 20) आणि त्याचा मित्र सुजल रामचंद्र बागणे (वय 20), (दोघे रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा, जि. सांगली) हे दोघे रविवारी दुचाकीवरून इंगळी येथील मामाकडे निघाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावरून जाताना नागाव फाट्याजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने हर्षदच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दोघेही काही अंतर फरफटत गेले. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला सुजल बाजूला फेकला गेला आणि तो गंभीर जखमी झाला तर हर्षदच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच शिरोली एमआयडीसी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी दोघांना तत्काळ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले मात्र यापैकी उपचारापूर्वीच हर्षदचा मृत्यू झाला तर सुजलवर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करून ट्रक जप्त केला आहे. हर्षदच्या माघारी आई, वडील, बहीण, आजोबा असा परिवार आहे. या घटनेमुळे हर्षदच्या कुटुंबियांवर मोठा डोंगर कोसळला आहे.