आपला महाराष्ट्रक्राईमठळक बातम्या

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या, केतकीला २४ मे पर्यंत पोलीस कोठडी

नवी मुंबई- अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ऍट्रॉसिटी कायद्यानुसार केतकीला रबाळे पोलिसांनी अटक केली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

केतकी चितळेविरोधात वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्ट प्रकरणी अॅड. स्वप्नील जगताप यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर रबाळे पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत तिला ठाणे कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले. ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याप्रकरणी केतकी चितळेच्या विरोधात मुंबईसह कळवा, पुणे, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, बीडमधील आंबेजोगाई, गोरेगाव, नाशिक, पवई, पुणे, आमरावती आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी कळवा पोलिसांनी अटक करून तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर गुरुवारी रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.

दरम्यान, शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणात केतकी चितळेच्या अडचणी अधिकच वाढताना दिसत आहेत. केतकी चितळेने मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती समोर आली आहे. पवारांसंबंधित फेसबुक पोस्ट केतकीला कुणीतरी पाठवली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. केतकी व्हॉट्सअॅपचा वापर करत नसून फक्त फेसबुक आणि SMS च्या माध्यमातून सक्रिय असल्याचं पोलिसात तपासात स्पष्ट झालं आहे.