महाराष्ट्रात ‘जोशी वडेवाले’ या नावाचं हॉटेल आणि त्याच्या फ्रेंचाईजी प्रसिद्ध आहेत. अशाच एका जोशी वडेवाले हॉटेलच्या फ्रेंचाईजी मध्ये एका गर्भवती महिलेला व तिच्या पतीला मारहाण करण्यात आल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे घडली असून जोशी वडेवाले हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या जोशी वडेवाले या हॉटेलमध्ये काव्या हेलगावकर आणि अंकित हेलगावकट हे पती-पत्नी वडापाव खाण्यासाठी गेले होते. मात्र मागवलेल्या वड्यामध्ये मीठ जास्त असल्यास त्यांच्या लक्षात आलं. याबाबतची विचारणा करण्यासाठी ते बिल काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांकडे गेले. हॉटेलचे कर्मचारी शुभम जैसवाल यांना याबद्दल विचारणा केली. यावेळी शुभम याने आरेरावी करत वाद घातले. त्यानंतर शुभमसह त्याच्या सोबत काम करणाऱ्या आणखी 5 जणांनी पीडित पती- पत्नीला लाथा बुक्याने मारहाण करत फायबरची खुर्ची फेकून मारली. या घटनेचा व्हिडिओ अंकित यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
या मारहाणीमध्ये फिर्यादी आणि त्यांची पत्नी हिच्या गळयातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील सोन्याची बाली तुटली. मारहाणी वरच न थांबता आरोपींनी फिर्यादींना जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर या पती-पत्नीने थेट पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.