जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिनाक्षी रविंद्र तळेले (वय 34) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (33) अशी मृत महिलांची नावे आहेत.
काय घडले नेमके?
सुसरी (ता. भुसावळ) येथील शेत शिवारात मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कोरडे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात होते. शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले हे मिनाक्षी रविंद्र तळेले वय व अनिता उर्फ ममता विनोद पाटील या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात कामे करीत होते. अचानक दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली.
यादरम्यान अनिता उर्फ ममता पाटील व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असताना अचानक त्यांच्यावर वीज कोसळल्याने या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच शेजारील शेतात काम करणाऱ्या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय 55) यांना झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. तसेच शेजारील शेतात काम करणाऱ्या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय 55) यांना झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. पोलिस पाटील नितिन पाटील यांच्या जबाबावरून वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.