Crime

पुण्यातील एकाच कुटुंबातील चौघांची ती सामूहिक आत्महत्या नव्हतीच; समोर आलं धक्कादायक सत्य 

769 0

पुण्यातील मुंढवा भागात घडलेल्या सामूहिक आत्महत्येला वेगळं वळण आलंय. ती घटना सामूहिक आत्महत्या नसून शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाल्यानं इंजिनिअर मुलानंच आपले आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंब संपवल्याचं आता समोर आलंय.

पुण्यातील मुंढवा परिसरात केशवनगरमध्ये राहणाऱ्या थोटे कुटुंबातील चार जणांनी केलेल्या आत्महत्येनं सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दीपक पुंडलिक थोटे, इंदू दीपक थोटे, ऋषिकेश दीपक थोटे आणि समीक्षा दीपक थोटे या चार जणांनी आर्थिक नुकसानीपोटी आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती मात्र या घटनेला आता वेगळंच वळण आलं. शेअर मार्केटमध्ये तोटा झाल्यानं मुलगा ऋषिकेश थोटे यानं आपले आई-वडील आणि बहिणीसह स्वतःच्याही जेवणात विष कालवून संपूर्ण कुटुंब संपवल्याचं पोलीस तपासात समोर आलं. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील रविदास नगर येथील रहिवासी असलेले दीपक थोटे यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची होती. त्यांनी आपल्या मुलाचं शिक्षण दर्यापूर या ठिकाणी पूर्ण केलं. त्यांची मुलगीही शिक्षण घेत होती. मुलगा ऋषिकेश हा इंजिनीअर झाल्यानंतर त्याने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवला.
सुरुवातीला नफा कमावला. अनेकांना प्रेरित करून त्यांच्यांकडून पैसेही घेतले. त्यातून त्यानं दर्यापूर येथे नवीन घर बांधलं. काही दिवसात शेती घेण्याचाही विचार ऋषिकेश करत होता. ऋषिकेशला वारंवार शेअर मार्केटमध्ये नफा दिसत होता. त्यानं दर्यापूर शहरातील कित्येक लोकांकडून पैसा घेतला आणि तो पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवला. नंतर ऋषिकेश हा आपल्या कुटुंबाला घेऊन एक वर्षापूर्वी पुण्यात राहण्यासाठी आला. पुण्यात तो एका खासगी कंपनीत कामही करत होता. ऋषिकेशनं शेअर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले होते, अशी माहिती समोर येतेय. मात्र शेअर मार्केटमध्ये मंदी आल्यानं ऋषिकेश नैराश्यात गेला. लोकांकडून लाखो रुपये घेतल्याने ते परत कसे करावेत या चिंतेत ऋषिकेश होता पण या संकटातून बाहेर पडण्याऐवजी त्याने टोकाचं पाऊल उचललं. आपले आई-वडील आणि लहान बहिणीच्या जेवणात विष कालवून त्यानं स्वतःसह सारं कुटुंबही संपवलं

Share This News
error: Content is protected !!