प्रेमात आणि युद्धात कोणतेही नियम नसतात, असे म्हणत मद्रास उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणातील आरोपीची मुक्तता केली आहे. आरोपी आणि तक्रारदार यांना स्वत:च्या इच्छेनुसार आयुष्य जगायचे असेल तर कायद्यासाठी यापेक्षा महत्त्वाचे काहीही असू शकत नाही, असे देखील न्यायालयाने नमूद केले आहे.
2014 मध्ये एका महिलेने एका मुलाला जन्म दिल्यानंतर संबंधित पुरुषावर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर त्याला याप्रकरणी न्यायालयाने शिक्षाही ठोठावली होती. त्यानंतर या व्यक्तीने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 2017 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका प्रलंबित होती. मात्र तेव्हाच न्यायालयाने महिलेच्या आणि संबंधित व्यक्तीच्या मुलाच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत हे प्रकरण मध्यस्थीकडे सोपवले. हे प्रकरण प्रलंबित असतानाच तक्रारदार महिलेने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला दुसऱ्या मुलाच्या जन्माबाबत खातरजमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या दुसऱ्या मुलाच्या जन्माचा दाखलाही सादर केला गेला. या याप्रकरणी न्यायमूर्ती एन शेषशायी यांच्या एकलपीठाने निकाल दिला.
दोष सिद्ध होऊनही आरोपी आणि तक्रारदार विभक्त झालेले नाहीत. हे दोघेही सज्ञान आहेत. दोघांनीही आपल्या इच्छेनुसार आयुष्य जगण्याचे ठरवल्यास, कायद्यासाठी यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. यातूनच नागरिकांना जगण्याची संधी मिळते. अशा प्रकरणात देशाच्या संविधानाने कोणतेही नैतिक भाष्य केलेले नाही. त्याचबरोबर फिर्यादी प्रत्यक्षात गुन्हा घडला ते सिद्ध करू शकले नाहीत, त्यामुळे बलात्काराच्या खटल्यातून आरोपीची मुक्तता करण्यात आली आहे.