Suicide

परीक्षेत कमी मार्क मिळाले, आई बोलली… अन् नववीतील विद्यार्थ्यांने उचललं टोकाचं पाऊल

984 0

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात शनिवारी नववीत राहणाऱ्या विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अस्पष्ट होते. मात्र आता हेच धक्कादायक कारण समोर आले आहे. शाळेत झालेल्या परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याबद्दल आईने विचारल्यामुळे या मुलाने आत्महत्या केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मल्हार मकरंद जोशी (वय १४) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मल्हार हा नववीत शिकत होता. मागच्या आठवड्यात शाळेत एक परीक्षा झाली होती. या परीक्षेत आपल्याला चांगले गुण मिळतील असा विश्वास मल्हारला होता. त्याबद्दल त्याने आई-वडिलांना देखील सांगितले होते. मात्र या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाले नाहीत. नेमके त्याच दिवशी मल्हारचे आई-वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले असता मल्हार आईच्या मैत्रिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी सव्वा बाराच्या सुमारास मल्हारच्या आई-वडिलांनी त्याला फोन केला. या फोनवर कमी मार्क मिळाल्याबद्दल आईने विचारणा केली असता मल्हारने फोन ठेवल्यानंतर थेट गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रोजलँड सोसायटीतील इमारतीमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मल्हारचे आई-वडील आणि भाऊ पुण्यात परत आले. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!