पुण्यात केल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढत असल्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी पोलीस ठोस पावले उचलताना दिसत आहेत. त्याचं अनुषंगाने पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून देशी बनावटीची चार पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. त्याचबरोबर दोन तरुणांना अटक केली आहे.
मंगेश राजु भोसले (वय २१, रा. कोल्हेवाडी, सिंहगड रोड फाटा) आणि संकेत शिवाजी गांडले (वय २१, रा. नांदेड फाटा), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या दोघांनाही सापळा रचून वडगाव खुर्द परिसरातून पकडण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना या संदर्भातली माहिती मिळाली होती. दोन तरुण वडगाव खुर्द येथील प्रायेजा सिटी कडे जाणाऱ्या कॅनल परिसरात थांबले आहेत आणि त्यांच्याकडे शस्त्र असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक तिथे दाखल झाले व शिताफीने या दोघांना ताब्यात घेतले.
दरम्यान या दोन्ही आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडे देशी बनावटीची चार पिस्तुले आणि सात जिवंत काडतुसे आढळून आली. ही पिस्तुले त्यांनी मध्य प्रदेशातून आणल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या दोघांचीही ओळख एका सराईत गुन्हेगारांसोबत असून त्यानेच यांना मध्य प्रदेशातील एका एजंटचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्याच एजंट कडून या दोघांनी शनिवारी पिस्तुले खरेदी केली. मात्र ही पिस्तुले कुठल्याही गुन्ह्यासाठी आणण्यात आली नसून केवळ हौस म्हणून आणल्याचे या तरुणांनी सांगितले. त्यामुळेच इतर मित्रांना दाखवण्यासाठी हे तरुण पिस्तूल घेऊन आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले, अशी माहिती या आरोपींनी दिली आहे. दरम्यान ही पिस्तुले नेमकी कशासाठी आणली होती ? किती रुपयांमध्ये पिस्तुलांची खरेदी करण्यात आली ? आणखी किती जणांना या एजंट ने पिस्तुले पुरवली ? याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.