दीप अमावस्या म्हणजेच गटारीच्या दिवशी आग्रह करून जेवायला घालून नंतर तरुणावर कोयत्याने वार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी दीपक जाधव, सनी जाधव, विजय जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित तरुणाने फिर्याद नोंदवली आहे. हा प्रकार थेऊर नायगाव रोडवरील दिल्लीवाला गोठा येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोहेल इसाक शेख हे थेऊर बसस्टॉपवर केस कापण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र विनायक गावडे याने त्याला दिल्लीवाला गोठा इथे जायचे असून मला तिथेच सोड असा आग्रह केला. त्यामुळे सोहेलने त्याला मोटारसायकलवरुन दिल्लीवाला गोठा येथे नेले. त्यावेळी तेथे त्यांच्या परिसरात राहणारे आणि सोहेलच्याही ओळखीचे असलेले सुरज शेख, प्रविण चेपटे, विजय जाधव, सनी पवार, दीपक जाधव हे भेटली. हे पाचही जण गटारी चा बेत आखून जेवण करून बसले होते. त्यांनी मद्यप्राशनही केले होते कारण बाजूलाच दारूच्या बाटल्या पडलेल्या पीडित तरुणाने पाहिल्या होत्या.
मित्राला सोडून सोहेल निघणार तेवढ्यात प्रविण चेपटे याने त्यांना तू देखील जेवण कर, असा आग्रह केला. म्हणून सोहेल व विनायक गावडे या दोघांनी जेवण एकत्र केले. त्यानंतर दीपक जाधव, सनी पवार, विजय जाधव यांनी विनाकारण फिर्यादी यांना मारहाण करुन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सनी पवार याने धारदार शस्त्राने सोहेलच्या डोक्यात वार केले. त्याचवेळी फिर्यादी आपला जीव मुठीत घेऊन तेथून पळून गेले. या प्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपासणी आरोपींचा शोध सुरू आहे.