अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका मद्यपी दुचाकीस्वाराने धडक दिल्याने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटे समाधी मंदिरासमोर घडली आहे. या प्रकरणी आरोपी दुचाकीचालकास अटक करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
प्रियंका बोरकर (26) रा. शेगाव, अमरावती असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. प्रियंका बोरकर या 2017 मध्ये अमरावती ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवर पोलीस अंमलदार म्हणून रुजू झाल्या होत्या. गेल्या एक वर्षांपासून त्या ग्रामीण मुख्यालयी नियंत्रण कक्षात कार्यरत होत्या. सर्व पोलीस ठाण्यातून नोंद गुन्ह्याची माहिती घेतल्यावर ड्युटी आटोपून त्या घरी निघाल्या होत्या. पहाटेच्या सुमारास पती सागर रमेश शिरसाट (31) यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच 27 सीजे 4078 ने घरी जात होत्या.
यादरम्यान संत गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील रस्त्यावर मागून आलेल्या भरधाव दुचाकी क्रमांक एमएच 12 आरडब्ल्यू 7530 ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रियंका ह्या गंभीर जखमी झाल्या. यानंतर त्यांचे पती सागर सिरसाट यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान प्रियंका यांचा मृत्यू झाला.धक्कादायक म्हणजे प्रियंका बोरकर या आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. गौरव गोपाल मोहोड (33) असे आरोपी बाईकचालकाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.