माणुसकी हादरवणारी, अंगावर काटा आणणारी घटनाप्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून निर्दयी बापाने आपल्या गर्भवती मुलीची तिच्याच सासरी जाऊन हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली.
ही संतापजनक घटना कर्नाटकातील हुबळी तालुक्यातील इनापूर गावात घडली आहे. मान्या पाटील आणि विवेकानंद दोड्डामणी यांनी सात महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवेकानंद दोड्डामणी हे दलित समाजाचे असल्यामुळे, मान्या पाटील यांच्या कुटुंबाने या लग्नाला तीव्र विरोध केला होता.
लग्नानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून तडजोडही घडवून आणली होती.त्यानंतर नोंदणीकृत अर्थात रजिस्टर लग्नानंतर मान्या आणि विवेकानंद हे हावेरी जिल्ह्यात वास्तव्यास होते. आपल्या कुटुंबाकडून धोका असल्याने दोघांनाही गावी येण्याची भीती होती.मात्र 8 डिसेंबर रोजी मान्या आणि विवेकानंद गावी परतले.त्या वेळी मान्या सहा महिन्यांची गर्भवती होती. मान्या गावात आल्याची माहिती मिळताच, तिच्या कुटुंबीयांनी तिची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला.रविवारी संध्याकाळी आरोपींनी विवेकानंदांचे वडील सुभाष दोड्डामणी यांच्यावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला. यानंतर विवेकानंद यांना फोन करून त्यांच्या वडिलांचा अपघात झाल्याची खोटी माहिती देण्यात आली.हे ऐकून विवेकानंद तातडीने घराबाहेर पडले.घरात त्या वेळी मान्या आणि तिची सासू रेणवासोबत एकट्याच होती. याच संधीचा फायदा घेत, मान्याचे वडील प्रकाशगौडा पाटील, नातेवाईक वीरंगौडा पाटील आणि भाऊ अरुण गौडा यांनी धारदार शस्त्रांनी या दोघींवर हल्ला केला.
या हल्ल्यात अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे मान्याचा जागीच मृत्यू झाला, तर तिची सासू गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे मान्या सात महिन्यांची गर्भवती होती. यानंतर आरोपींनी सासरच्या इतर सदस्यांवरही तलवारीने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांनी मृत तरुणीचे वडील प्रकाशगौडा पाटील यांना अटक केली असून, इतर आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.
प्रेम विवाह केल्याच्या रागातून एका बापाने आपल्या गर्भवती मुलीची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना आजही समाजामध्ये भिनलेल्या जातीय मानसिकतेचे रूप अधोरेखित करतीये.. या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी ताब्यात घेतात आणि त्यांची कसून चौकशी करतात हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे.