बीड : बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. परळीमध्ये धावत्या शिवशाहीच्या बसने पेट (Bus Fire) घेतला आहे. बसचं टायर फुटल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या अपघातामधून प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मात्र बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवांशामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले.
काय घडले नेमके?
परळी शहरात रात्री एसटी महामंडळाच्या चालत्या शिवशाही गाडीचे टायर फुटल्यानं गाडीनं पेट घेतल्याची घटना घडली. बसनं पेट घेतल्याचं चालकाच्या वेळीच लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. बसच्या चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत शिवशाही बस पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बस जळाल्याने महामंडळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लातूर-परभणी शिवशाही बस परळी शहरात येताच बसचं टायर फुटलं. बसचं टायर फुटल्यानं बसला भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या अपघातामुळे तुम्हाला समुद्धी महामार्गावर झालेल्या ट्रॅव्हल्स बस अपघाताची आठवण आली असेल. त्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.