आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक (Chandrababu Naidu Arrest) करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केलं होतं. जाहीर भाषणानंतर नायडू आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आराम करत होते. शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास, नायडू यांना अटक करण्यासाठी एपी सीआयडी त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आले, परंतु पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी वाहनाला घेराव घातला आणि आंध्र प्रदेश सीआयडीला चंद्राबाबूंना अटक करू दिली नाही. यादरम्यान चंद्राबाबूंच्या टीडीपीचे नेते, कार्यकर्ते आणि आंध्रप्रदेश सीआयडी पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली.
त्यानंतर सकाळी 6 च्या सुमारास चंद्राबाबू नायडू व्हॅनमधून खाली उतरले आणि त्यांनी पोलिसांशी चर्चा केली. त्याच्या अटकेसाठी 51CrPC अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली होती. नायडू यांनी या प्रकरणाचा तपशील मागितला. मात्र पोलिसांनी माननीय न्यायालयासमोर तपशील सादर केल्याचं सांगत तपशील देण्यास नकार दिला. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. नायडू यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचं मान्य केलं. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
कोणत्या प्रकरणात करण्यात आली अटक ?
कौशल विकास घोटाळ्यात चंद्राबाबू नायडू यांना आरोपी 1 म्हणून नाव देण्यात आलं आहे, ज्यात 250 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. पोलीस अधिकार्यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना कौशल विकास प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयानं जारी केलेल्या एफआयआर प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे.