45 दिवसांमध्ये दाम दुप्पट परतावा देण्याचं अमिष दाखवून गुंतवणूकदारांना 19 कोटींपेक्षा जास्त रकमेचा गंडा घातल्याच प्रकरणं उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.. पाहुयात हा प्रकार नेमका कुठे घडला आणि हे प्रकरण नेमकं काय आहे?
आरोपी राजेंद्र नेर्लीकर व त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर यांनी फॉरेक्स ट्रेडिंग कंपनी स्थापन केली. हुपरीसह कोल्हापूर शहरातही त्याने आलिशान कार्यालय थाटले होते. गुंतवणूक केल्यास 45 दिवसांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. मुदतीनंतर मुद्दल, परतावा देण्यास आरोपी राजेंद्र नेर्लीकर व त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर यांनी टाळाटाळ केली. गुंतवणूकदार विनायक पाटील यांच्यासह 38 जणांनी हुपरी पोलिस ठाण्यात नेर्लीकर पिता-पुत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने संशयित बालाजी नेर्लीकरला तात्काळ अटक केली होती. मात्र मुख्य संशयित राजेंद्र नेर्लीकर गुन्हा दाखल होताच पसार झाला होता.कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह त्याचा शोध घेण्यात आला. पण पोलिसांना राजेंद्र नेर्लीकर सापडत नव्हता. पोलिसांच्या पथकाने आदमापूर येथील हॉटेलवर छापा टाकून राजेंद्र नेर्लीकर याला ताब्यात घेतले. इचलकरंजी येथील न्यायालयाने संशयिताला 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.दामदुप्पट परतावा हा शब्द ऐकला की अनेकांना सहज मोह होतो पण या मोहाचं रूपांतर अनेकदा फसवणुकीत होतं.
हुपरीतील फॉरेक्स ट्रेडिंग घोटाळा हे त्याचंच एक उदाहरणं आहे. या प्रकरणातील संशयित पिता पुत्रांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या प्रकरणात त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे..