संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी घटना उरण शहरात घडली होती. 20 वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची हत्या करून अतिशय छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह विटंबना करून टाकून दिल्याचे आढळून आले होते. यशश्रीची हत्या तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या दाऊद शेख नावाच्या तरुणाने केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. तेव्हापासून पोलीस प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दाऊदचा शोध सुरू होता आणि आता अखेर आज सकाळीच दाऊदला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. दाऊदचे यशश्रीवर प्रेम होते तर मग त्याने तिची इतकी निर्घुण हत्या का केली ? याचा तपास सध्या सुरू असून याबद्दलची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी दिली आहे.
उरण शहरात राहणारी यशश्री शिंदे ही 20 वर्षीय तरुणी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तिचा शोध सुरू असतानाच यशश्रीचा मृतदेह काल कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला. यशश्री च्या चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा करण्यात आला होता. प्रायव्हेट बॉडी पार्ट वर जखमा आढळल्या. त्यामुळे हे प्रकरण समोर येताच नवी मुंबईत संतप्त वातावरण झाले होते. त्यामुळेच युद्धपातळीवर पोलीस आरोपीचा शोध घेत होते. त्यानंतर आता हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र आरोपीने यशश्रीची हत्या का केली ? याबद्दलची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे.
याबद्दल बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त दीपक साकोरे म्हणाले, ‘मयत तरुणी आणि आरोपीत यांची आधीपासून ओळख किंवा मैत्री होती. मागील 3 ते 4 वर्षांपासून ती आरोपीच्या संपर्कात नव्हती. याचाच राग डोक्यात ठेवून त्याने हे कृत्य केले असावे असे दिसत आहे. मयत आणि आरोपी या दोघांचा संपर्क झाला होता. ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी भेटण्याचे दोघांनी ठरवले होते. त्यासाठीच मयत तरुणी घराबाहेर पडली होती. तिथे अपहरण वगैरे काही नाही झाले. ते दोघे भेटले, त्यावेळी त्यांच्यात वाद झाले असावे, त्यानंतर हा प्रकार घडला असण्याची शक्यता आहे. मात्र अजून चौकशी पूर्ण झालेली नाही त्यामुळे नेमके काय घडले हे सांगणे थोडे कठीण आहे.’ पोलिसांनी दिलेल्या या माहिती वरून गुन्हा घडण्या मागची अंदाजे पार्श्वभूमी स्पष्ट होत आहेत. मात्र तपासातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे
 
                         
                                 
                             
                             
                             
                            