भीक मागण्यासाठी तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

458 0

पुणे – भीक मागण्यासाठी आणि लग्नात हुंडा मिळवण्यासाठी एका तीन वर्षांच्या मुलीचं पुण्यातून अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

उषा नामदेव चव्हाण (40, रा. श्रीगोंदा, जि अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना 23 मे रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात ढोलेपाटील रोडवर एका फुगे विकणाऱ्या महिलेच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण झालं होते. ही मुलगी आईसह एका रिक्षात झोपली होती. तेव्हा या मुलीला अलगद उचलून पळवून नेण्यात आले. आरोपींनी मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला शालीने गुंडाळले. पोलिसांनी तब्बल 5 दिवस 250 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी महिलेला हातात असलेल्या पिशवीवरून आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.

या पिशवीवर असलेल्या किरकोळ विक्रेत्याच्या नावावरून पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. किरकोळ विक्रेत्याच्या अहमदनगरमध्ये श्रीगोंदा आणि काष्टी येथे शाखा आहेत. त्यानुसार पोलिसांनी श्रीगोंदा येथे जाऊन खबऱ्यांमार्फत माहिती काढली असता उषा चव्हाण ही मुलगी घेऊन आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडले. अपहरण करण्यात आलेली मुलगी उषा चव्हाणच्या घरात आढळून आली. पोलिसांनी तिची सुखरूप सुटका केली.

वरिष्ठ निरीक्षक विनायक वेताळ, निरीक्षक दीपाली भोसले आणि सहायक निरीक्षक अमोल घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांच्या पथकाने हे कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!