मुंबई- सोशल मीडियावर किमतीचे लेबल लावून कॉल गर्ल्स असा उल्लेख करत तरुणींचे फोटो शेअर करणाऱ्या विकृत तरुणाला अँटॉप हिल पोलिसांनी अटक केली आहे.
शुभम गडलिंगे (वय 22 वर्ष, रा. वडाळा ) असे आरोपीचे नाव आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपले फोटो कॉल गर्ल म्हणून व्हायरल होत असल्याची तक्रार मुंबईतील सात महिलांनी केली होती. या कृत्यामागे आपला मित्र शुभम गडलिंगे याचा हात असल्याचा आरोप तक्रारदार महिलांनी केला आहे. 200 हून अधिक महिला या प्रकाराला बळी पडल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी गडलिंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शुभमने महिलांच्या संबंधित सोशल मीडिया अकाऊंटवरुन या महिलांचे फोटो आणि व्हिडीओ (Obscene Photo) चोरल्याचा दावा महिलांनी केला आहे. त्यानंतर त्याने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर त्यांची फेक अकाऊण्ट तयार केली, आणि पैशांच्या मोबदल्यात लैंगिक सुख देण्याचे आश्वासन देत फॉलोअर्सना त्यांची छायाचित्रे खासगीरित्या पाठवली, अशी तक्रार या महिलांनी केली आहे. या सर्व महिला शाळा, कॉलेज, सोसायटी, कौटुंबिक औळख असलेल्या किंवा नातेवाईक आहेत.
पोलिसांनी शुभम गडलिंगेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. मात्र, अटकेनंतर एकाच दिवसात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रेयसीसोबत नातं तुटल्यानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचं मनस्वास्थ्य ढासळले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.