सातव्या मजल्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू; बिल्डर सह चौघांवर गुन्हा दाखल

LABORER ACCIDENT: एमएनटी कन्स्ट्रक्शनच्या साइटवर सातव्या मजल्यावरून कोसळून मजुराचा मृत्यू; बिल्डर सह चौघांवर गुन्हा दाखल, मजुरांची सुरक्षा ऐरणीवर

519 0

पुण्यातील बाणेर परिसरात बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडल्यानं एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला. हे बांधकाम एमएनटी कन्स्ट्रक्शन (MnT constructions) च्या द्वारे सुरू आहे. मात्र मजुराच्या मृत्यूनंतरही या घटनेची कुठेही चर्चा झाली नाही. ऐन तारुण्यात जीव गमावलेल्या या मजुराच्या मृत्यूमुळे बांधकाम कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नेमकं काय घडलं ?

10 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. ‘वृंदानंद ब्लीस’ ( Vrindanand bliss) असं या इमारतीचं नाव असून एमएनटी कन्स्ट्रक्शन (MnT constructions) चा हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी अजित बाघले (Ajit baghale, वय वर्ष 25, रा. मूळ छत्तीसगड, सध्या पुणे येथे कन्स्ट्रक्शन साइटवर) या कामगाराचा मृत्यू झाला. हा मजूर सकाळी प्लास्टर करण्यासाठी इमारतीच्या सातव्या मजल्यावर गेला होता. यावेळी काम करत असताना तो सातव्या मजल्यावरून खाली कोसळला. त्याची अनेक हाडं तुटली, डोक्याला जबर मार लागला होता. त्याच परिस्थितीत त्याला काही मजुरांनी आणि साइटवर असलेल्या इतरांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मजूर कोसळल्याची माहिती कन्स्ट्रक्शन साइटवरील कोणीही पोलिसांना दिली नाही. रुग्णाला दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक उत्तम मकवाना यांच्यासह कॉन्ट्रॅक्टर राजू वितलावत, साइट इंजिनियर सागर पवार, प्रोजेक्ट मॅनेजर परेश राघवानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाणेर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

गृहप्रकल्प निर्मितीच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिक करोडो रुपये कमावतात. पण या इमारती उभ्या राहाता राहाता किती तरी कामगार आपला जीव गमावतात. मजुरांचा जीव जातो पण बिल्डरचे काय जाते? या कामगारांचा वाली कोण? या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरित आहे. अजित बाघले हा पंचविशीतला तरूण पाच-सहा दिवसांपूर्वी छत्तीसगड येथून पुण्यात पोटापाण्यासाठी येतो काय आणि इमारतीच्या सातव्या मजल्यावरून कोसळून जीव गेल्यानं या तरूणाचा मृतदेह एका आठवड्याभरात त्याच्या गावी जातो काय? पोटापाण्यासाठी घरातून बाहेर पडलेला आपल्या चालत्या-बोलत्या तरूण मुलाचा मृतदेह पाहून त्याच्या कुटुंबीयाची अवस्था काय झाली असेल, याचा विचारही करवत नाही. कामगारांच्या जिवाचं रक्षण करणं हे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदाराची जबाबदारी असते. कामगार कायद्यातही याबाबतची तरतूद करण्यात आली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचा आढळून येत आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत आहेत.

Share This News
error: Content is protected !!