अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन आरोपीची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
2020 मध्ये बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी संशयीतांना अटक केली होती. या प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तपास करत एका ऑस्ट्रेलियन आर्किटेक्टला अटक केले होते. मात्र कोर्टाकडून त्याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे न आढळल्याने कोर्टाने त्याची निर्दोष सुटका केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात संशयित असल्याच्या आरोपाखाली ऑस्ट्रेलियन आर्किटेक्ट पॉल बार्टेल्स याला अटक केली होती. तो ड्रग्स विक्री करत असल्याचा संशय होता. या प्रकरणात आधीच अटक केलेल्या दोन संशयितांनी पॉल बार्टेल्स याचे नाव घेतले होते. त्यामुळे त्याला ताब्यात घेऊन कोर्टात हजर करण्यात आले होते. मात्र त्याच्यावरील आरोप सिद्ध होण्यासाठी लागणारे कोणतेही पुरावे पोलिसांकडे नसल्याने ठोस पुराव्यांच्या अभावी त्याची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
न्यायालय काय म्हणाले ?
या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर निकाल देताना कोर्ट म्हणाले, ‘एनडीपीएस कायद्याच्या कलम 67 अंतर्गत आरोपीने दिलेले किंवा नोंदवलेले विधान हे खटल्यात कबुली जबाब म्हणून वापरले जाऊ शकत नाही. ते पुढे म्हणाले की, ‘जेव्हा पोलिसांच्या तपास पथकाने संशयित आरोपीच्या घरावर धाड टाकून, घराची झडती घेतली तेव्हा कोणताही प्रतिबंधित पदार्थ आढळून आला नाही. त्यामुळे बार्टेल्स याची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे.