“आम्ही ठोकत नाही ओ, आम्ही तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे” असे स्टेटस टाकून सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या तरुणाला बारामती पोलिसांनी धडा शिकवला. पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्याही ठोकल्या.
श्रीकांत अर्जुन घुले असं या आरोपीचं नाव आहे. चिकू दादा ऑफिशियल या नावाने त्याचे सोशल मीडियावर अकाउंट आहेत. याच अकाउंट वरून दहशत माजवणारं, गुन्हेगारीला प्रवृत्त करणारं स्टेटस त्यानं टाकलं होतं. “आम्ही ठोकत नाही ओ, “मी तोडतो माझा पॅर्टनच वेगळा आहे”, असाच डायलॉग वापरत “सरकार No comprmise” असे कॅप्शन टाकुन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाचे व्हिडिओ टाकले होते. हे स्टेटस बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या नजरेस पडताच त्यांनी या विरोधात कारवाई केली. श्रीकांत घुले या तरुणा विरोधात BNS कलम 353 (2) नुसार गुन्हा दाखल करून तालुका पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अशा प्रकारचे स्टेटस ठेवून कुणी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, पोलीस त्यावर कारवाई करतील, असं आवाहन बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केलं आहे.