क्राईम

..अन् मित्रांच्या समोरच तरुण गेला वाहून; खेडमधील धक्कादायक घटना मोबाईल मध्ये कैद

गेल्या महिनाभरात पुण्यातील विविध धरणे, धबधबे, नद्या यांमधून नागरिक वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिक खोल प्रवाह असलेल्या पाण्यात जात असल्याने अशा प्रकारचे अपघात वाढत आहेत. अशीच एक घटना खेड तालुक्यात घडली. मित्रांच्या डोळ्यासमोरच एक मित्र पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात वाहून गेला. या तरुणाचा सध्या बचाव पथकाकडून शोध सुरू आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात असलेल्या शेल्डी धरणाच्या परिसरात रविवारी काही मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यातले तिघेजण धरणाच्या प्रवाहात उतरले. मात्र त्यातील एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहाच्या मुख्य भागात गेला आणि तिथूनच तो वाहून गेला. ही घटना रविवारी दुपारी घडली. तर तिथेच असलेल्या एका मित्राच्या मोबाईल मध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे.

 

जयेश रामचंद्र आंब्रे (वय. 32) असे या तरुणाचे नाव असून तू रविवारी वाहून गेला. अनेक दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहत आहेत. त्याचबरोबर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ज्यामुळे मानवी वसाहतीपर्यंत हे पाणी शिरले आहे. जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आला आहे. तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मदत कार्य, बचाव कार्य सुरू आहे. मात्र असे असूनही अनेकजण पाण्याच्या ठिकाणी फिरण्यासाठी, पोहण्यासाठी जात आहेत. ज्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.