पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावाचा खून केल्याच्या रागातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना थेरगाव मधील जगताप नगर परिसरात शनिवारी रात्री घडली.
साहिल राहुल साबळे (वय-18, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मयत साहिल याच्या आईने वाकड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार यश भगवान रोकडे (वय-20, रा. बौद्धनगर, पिंपरी), अरुण परदेशी (वय-19, रा. काळेवाडी), ओमकार कामत (वय-24), प्रथमेश विष्णु हजारे (वय-22), लक्ष्मण कोळी (वय-21), अशपाक दिलशाद शेख (वय-21, रा. बौद्धनगर, पिंपरी) यांच्यासह खुनात सहभागी असलेल्या इतर साथीदारांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत साहिल याने काही दिवसांपूर्वी आरोपीचा भाऊ असलेल्या गणेश उर्फ दादू रोकडे याचा खून केला होता. त्याचाच राग मयत गणेशच्या भावाने डोक्यात ठेवला होता. त्यानुसार त्याने साहिलचा काटा काढायचं ठरवलं. आणि आपल्या काही साथीदारां सोबत मिळून त्याने साहिलवर नजर ठेवली.
साहिल हा शनिवारी रात्री जगतापनगरमध्ये आल्याची माहिती आरोपीच्या साथीदाराने त्याला दिली. त्यावेळी लगेचच साहिलला गाठून आरोपीने त्याच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार केले. गंभीर जखमी झालेला साहिल खाली कोसळल्यानंतर दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत साहिल याच्या आईच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी सर्व आरोपींना विरोधात गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.