संपूर्ण देश महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये होरपळत असताना बदलापूर मध्ये देखील अशीच घटना घडली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र खळबळून जागा झाला. राज्यभरातून निदर्शनं करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते. हे प्रकरण चार ते पाच दिवस उशिरा समोर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच पोलीस आणि राज्य सरकार सुद्धा आता ॲक्शन मोड मध्ये आले आहे.
आत्तापर्यंत काय काय घडलं ,?
• 12 व 13 ऑगस्ट रोजी बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन 4 वर्षांच्या विद्यार्थिनींवर 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने शौचालयात लैंगिक अत्याचार केले.
• यातील एका मुलीने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार कुटुंबीयांकडे केल्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले.
• बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा पालकांचा आरोप आहे.
• पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
• घटनेची माहिती प्रसार माध्यमांवर येताच राज्यभरात खळबळ उडाली.
• बदलापूर मधील संतप्त जमावाने रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केलं. आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. ज्यामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली .
• असेच आणखी संतप्त पालक आणि नागरिकांनी एकत्र येत शाळे समोर आंदोलन केलं.
• यानंतर शाळा प्रशासनाच्या वतीने माफी नामा सादर करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका आणि विद्यार्थ्यांना स्वच्छतागृहात ने-आण करण्याची जबाबदारी असलेल्या आयांना निलंबित करण्यात आलं.
• या प्रकरणातील आरोपी असलेला सफाई कर्मचारी तुझ्या कंत्राटदार कंपनीच्या माध्यमातून कामावर रुजू झाला होता त्या कंपनीचा करार रद्द करून कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आलं.
• प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली. काल त्या ठिकाणचे पोलिस निरीक्षक शितोळे यांची बदली केली असून किरण बालवडकर यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत असल्याने फडणवीसांनी माध्यमांसमोर येत आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी देखील आरोपीला कठोर शिक्षा देऊ असे सांगत हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवला जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर या प्रकरणी ॲड. उज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.
• या प्रकरणातील आरोपीचे वकीलपत्र घेऊ नका असा आवाहन कल्याण वकील संघटनेतर्फे करण्यात आलंय तर आरोपी अक्षय शिंदेला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटतायत. एकीकडे कायदेशीर कारवाई चालू असताना राजकीय वर्तुळात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ उडालाय. दोन्ही बाजू एकमेकांवर टीका करतायत. तर बदलापूरकरांनी केलेल्या आंदोलनामागे विरोधी पक्षाचा हात असल्याची टीका केली गेली त्या अनुषंगाने आता आंदोलन करणाऱ्यांपैकी तीनशे जणांवर गुन्हे दाखल झालेत. तर 40 जणांना अटक देखील झाली आहे. हे आंदोलन राजकीय लोकांनी पेटवल्याचे आरोप केले जात आहेत.