ऑनलाइन गेमिंगच्या (online gaming) नादात लोकांनी 5-10 लाख गमावल्याचं, पूर्ण बँक अकाउंट रिकामं केल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र याच ऑनलाईन जुगारात तरुणाने चक्क 90 लाख रूपये, 6 एकर जमीन, 2 तोळे सोनं गमावल्याचं उघडकीस आलं आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातल्या कुर्डवाडीत राहणाऱ्या बालाजी खरे नावाच्या तरुणाबरोबर हा सर्व प्रकार घडला. बालाजीचे शिक्षण केवळ आठवीपर्यंत झालंय. त्याचं नऊ जणांचं कुटुंब असून कुटुंबातील बरेचसे लोक कामाला जातात. बालाजीच्या कुटुंबाकडे बारा एकर शेती होती. मात्र बालाजीला सुरुवातीपासून झटपट आणि विना मेहनत पैसा कमवायचा होता. झटक्यात जास्त पैसा कमावण्याच्या नादात तो ऑनलाइन गेमिंग कडे वळाला. ‘चक्री गेम’ हा एक ऑनलाईन जुगाराचा प्रकार आहे. ज्यामध्ये इतर ऑनलाइन गेम्स प्रमाणे खेळाडूंना झटपट पैसे जिंकण्याचं आमिष दाखवलं जातं. मात्र याच अमिषामुळे अनेक तरुण लाखो रुपये गमावतात. अगदी तसंच बालाजी बरोबर घडलं. हा खेल खेळण्यापूर्वी एजंटला पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे त्याने टप्प्याटप्प्याने लाखो रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. अनेकदा पैसे हरल्यानंतरही त्याला आपण कधीतरी मोठी रक्कम चिंकू असं वाटायचं. मात्र तसं घडलं नाही. पाच-दहा नाही तर त्याने तब्बल ९० लाख, सहा एकर जमीन आणि दोन तोळे सोनं गमावलं. ज्यामुळे बालाजीचा संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलंय.
ऑनलाईन गेमपासून सावधान
या ऑनलाइन जुगारातून आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात येताच बालाजीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी तीन एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून पोलिसांकडून आणि सरकारकडून वारंवार ऑनलाईन गेम पासून दूर राहण्यास सांगितलं जात असूनही अनेक तरुण याला बळी पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या ऑनलाइन गेमिंग वर बंदी घालण्याची मागणी देखील केली जात आहे.