राज्यासह देशात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढलं आहे. हे अत्याचार रोखण्यासाठी पोलीसही प्रयत्न करत आहेत मात्र यातच बलात्कारांच्या खोट्या तक्रारी दाखल होत असल्याचं आढळून येत आहे. अशीच एक घटना बारामती शहरात घडली. एका अल्पवयीन मुलीने जुन्या बॉयफ्रेंडला तुरुंगात पाठवण्यासाठी चक्क दुसऱ्या बॉयफ्रेंड सोबत मिळून बलात्काराची खोटी स्टोरी रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी बारामती शहरातील सामाजिक कार्यकर्ते मछिंद्र टिंगरे यांना एका अल्पवयीन मुलीने फोन केला. फोनवर ही मुलगी जोर जोरात रडत आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगत होती. आपल्याच एका जुन्या मित्राने ऊसाच्या शेतात नेवून आणखी तीन मुलांना बोलावून त्यांच्यासह आपल्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला. मुलीची अवस्था फोनवरून अतिशय बिकट असल्याचे वाटत असल्याने टिंगरे यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. आणि पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला.
या मुलीने तिच्या बॉयफ्रेंड च्या मदतीने एक कथानक रचलं होतं. ती आपल्याबरोबर सगळं काही खरोखर घडल्यासारखं सांगत होती. मात्र याच अल्पवयीन मुलीला महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपूस केली. मात्र ही मुलगी प्रत्येक वेळी देत असलेल्या उत्तरांमध्ये काहीतरी बदल होत होता. त्यातच या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या होत्या.
त्यामुळे बारामती शहर पोलिसांवरचा दबाव वाढला होता. मुलीने रचलेल्या स्टोरीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र या तपासातून मुलगी सांगत असलेल्या गोष्टी निष्पन्न होत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे
तपासायला सुरुवात केली. त्यामध्ये देखील पोलिसांना पुरावे आढळले नाहीत. दुसरीकडे मुलगी सांगत असलेल्या स्टोरीमध्ये उलट प्रश्न केल्यास ही मुलगी वेगवेगळी उत्तर देत असल्याने पोलिसांना शंका आली. तपास करू नाही पुरावे सापडत नसल्यामुळे ही मुलगीच पोलिसांची दिशाभूल करत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलीला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने हा सगळा फिल्मी स्टाईल बनाव आपल्या जुन्या बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी केला असल्याचं स्पष्ट झालं.