एका शाळेतील 13 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कांदिवली मध्ये घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हा प्रकार २९ जुलै ते ३० जुलैदरम्यान घडला. घाबरलेल्या पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने स्वतः मुलीच्या पालकांना या प्रकरणाची कल्पना देऊन कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लांगिक अपराधापासून संरक्षण कायद्या अर्थात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.
कांदिवलीतील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुली बरोबर हा प्रकार घडल्याचा संशय शाळेतील मुख्याध्यापकांना आला होता. मुख्याध्यापिकेने मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्याध्यापिकेने तातडीने पीडित मुलीच्या आई-वडिलांना शाळेत बोलावून घडलेला प्रकार सांगितला. आम्ही तुमच्या जबाबदारीवर आमच्या मुलींना शाळेत पाठवतो. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच असल्यामुळे शाळेनेच या प्रकरणात कारवाई करावी, अशी मागणी पालकांनी केली. त्यानंतर मुख्याध्यापिकेने याप्रकरणी कांदिवली पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.