देशात दररोज महिला अत्याचाराच्या नवनवीन घटनासमोर येत आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडून अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. तर आता अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या अत्याचारांमध्येही वाढ होताना दिसून येत आहे. अशीच एक गंभीर घटना पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पीडित मुलीच्या आत्याच्या नातवाने या मुलीला लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
पीडित मुलगी आणि आरोपी मुलगा हा एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे दोघेही एकत्र खेळत असताना आरोपीने लपाछपी खेळण्याच्या बहाण्याने मुलीला घराच्या पहिल्या मजल्यावर नेले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करत ‘आपण शारीरिक संबंध ठेवूया, खूप मजा येईल’, असे म्हणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या मुलाची हिम्मत इतकी वाढली की त्याने कोणालाही काहीही सांगू नको अशी धमकी मुलीला देऊन तिच्यावर चार ते पाच वेळा अत्याचार केले. यामधून ही मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर हा सर्व प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आला.
मुलीच्या आईने मुंडवा पोलीस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण हा मुलगा अल्पवयीन आहे. मात्र तरीही या मुलाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.