एक वर्षाच्या स्थानबद्धतेतून बाहेर सुटून बाहेर आल्यानंतर काही काळ होता शांत राहिलेला कुख्यात गुंड गजा मारणे आता पुन्हा एकदा त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळं चर्चेत आलाय. शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन त्यासाठी व्यावसायिकाचं अपहरण करुन त्याला मारहाण केल्याप्रकरणी कुख्यात गुंड गज्या मारणे याच्यासह 7 ते 10 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आहे. व्यावसायिकाचं अपहरण केल्यानंतर दुसर्याच्या फोनवरुन मी ‘महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाही तर तुला संपवून टाकीन’, अशी धमकीही कुख्यात गुंड गज्या मारणे यानं दिल्यानं त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
7 ते 8 ऑक्टोबरदरम्यान कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी नांदेड सिटीमध्ये राहणार्या एका 33 वर्षीय व्यावसायिकानं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिल्यानंतर गजा मारणे, हेमंत पाटील, फिरोज तात्या, अमर किरदत्त, पप्पू घोलप, रुपेश मारणे एक महिला आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा रियल इस्टेट व शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. हेमंत पाटील यांनी शेअर ट्रेडिंगसाठी फिर्यादीला नोव्हेबर 2021 मध्ये 4 कोटी रुपये दिले होते. फेब्रुवारी 2022 मध्ये फिर्यादीला शेअर ट्रेडिंगमध्ये तोटा झाल्यानं हेमंत पाटील याचे 4 कोटी रुपये परत करणं त्यांना शक्य झालं नाही. हेमंत पाटील यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी होऊ लागल्यानंतर फिर्यादीनं त्यांना गणपतीपुळे येथील 4 कोटी रुपयांची जमीन देण्याची तयारी दर्शवली. त्यावर हेमंत पाटील यानं 20 कोटी रुपयांची मागणी केली. 7 ऑक्टोबर रोजी फिर्यादी आणि त्यांचा मित्र कात्रज येथील आयसीआयसीआय बँकेतून बाहेर पडले असता त्यांच्या गाडीजवळ थांबलेल्या चार जणांनी फिर्यादीला जबरदस्तीन गाडीत बसवलं आणि त्यांच्यापैकी एकानं मी पप्पू घोलप आहे, आम्ही गजा मारणेच्या गँगमधील आहोत, असं सांगितलं. त्यानंतर हेमंत पाटील गाडीत येऊन बसला आणि त्यानं फिर्यादीकडं 20 कोटी रुपयांची मागणी केली आणि फिर्यादीला गाडीतून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवत ठेवलं. या दरम्यान, पप्पू घोलप यानं त्याच्या संतोष नावाच्या साथीदाराला फोन लावला आणि गजा मारणेला फोन द्या, असे सांगितलं. त्यानंतर गजा मारणे यानं फोनवरून “मी महाराज बोलतोय, तुमचा जो काय विषय असेल तो मिटवून घ्या, नाहीतर तुला संपवून टाकीन,” अशी धमकी दिली. फिर्यादीनं घाबरून जाऊन पैसे देण्यास होकार दिला मात्र फिरोज तात्या, अमर किरदत्त, हेमंत पाटील यांनी तुला पैसे महत्त्वाचे आहेत की जीव, असं म्हणून फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीला त्याचे मित्र आणि भावाला फोन लावायला सांगितला. त्यांच्याशी फोनवरून बोलणं झाल्यानंतर रात्री 10 च्या सुमारास रावेत येथील हॉटेल तोरणा येथे फिर्यादीला नेण्यात आलं. त्याठिकाणी आरोपींसोबत एक महिला होती. ‘तू जर येथे काही वेडवाकडं केलं तर मी तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन,’ अशी धमकी त्या महिलेनं फिर्यादीला दिली. जेवण झाल्यावर फिर्यादीला गाडीतून हायवेवर फिरवत ठेवलं आणि मध्यरात्री दीडच्या सुमारास फिर्यादीच्या मित्राशी चांदणी चौकात बोलणं झाल्यानंतर फिर्यादीला सोडून देण्यात आलं. याबाबत कुणाशी बोलल्यास किंवा पोलिसांना माहिती दिली तर तुला व तुझ्या घरंच्याना जिवंत सोडणार नाही, अशी धमकीही दिली. त्यानंतर पप्पू घोलप यानं सकाळी 10 वाजता त्याच्या ऑफिसला बोलावलं मात्र त्यापूर्वीच फिर्यादीच्या भावानं पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. फिर्यादीनुसार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. इकडं दुपारी दीडच्या सुमारास एसजीएस मॉलजवळ त्यांनी फिर्यादीला त्याच्या भावाच्या ताब्यात दिल्यानंतर फिर्यादीनं तात्काळ पोलीस आयुक्तालयात जाऊन खंडणीविरोधी पथकाकडं तक्रार केली.