कोणत्याही कुटुंबात बाळ जन्मण्याचा आनंद हा सगळ्यात मोठा असतो. असाच आनंद देसरकर कुटुंबाला झाला होता. कारण तब्बल दहा वर्षांनी देसरकर दाम्पत्याला बाळ झालं होतं. याच बाळाचं बारसं संभाजीनगरमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र आनंदात हे बारसं आटपून पुण्याला जात असतानाच देसरकर कुटुंबीयांचा अपघात झाला आणि बाळासह कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. ही घटना संभाजीनगरपासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबेजळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देसरकर कुटुंबीय पुण्याच्या दिशेने आपल्या कारमधून निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या कारला दारू पिऊन बेशिस्तपणे गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीने जोरदार धडक दिली. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या आरोपी डिव्हायडरला ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले. अपघात इतका भीषण होता की कारमध्ये असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत. सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे यामध्ये बाळाचा देखील मृत्यू झाला आहे. मृणाली अजय देसरकर (वय 38), आशालता हरिहर पोपळघट (वय 65), अमोघ देसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (वय 7 वर्ष) अशी मृत्यू झालेल्या चौघांची नावं असून अपघातात बाळाचे वडील अजय देसरकर(वय 40) आणि शुभांगिनी सागर गीते (वय, 35) हे गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातास कारणीभूत असलेल्यांची नावं विशाल उर्फ उद्धव ज्ञानेश्वर चव्हाण (वय 22 वर्ष), कृष्णा कारभारी केरे (वय 19 वर्ष) अशी आहेत. तर चालक कृष्णा केरे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याने हा भीषण अपघात झाला. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.