सांगली : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील जत शहरातील विठ्ठलनगर परिसरातील आदाटे वस्तीच्या जवळ एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये शेत तलावातील पाण्यात बुडून माय-लेकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना (Sangli News) गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. मिनाक्षी चंद्रकांत माने (वय 27) आणि मुलगा अलोक चंद्रकांत माने (वय 3) अशी मृत मायलेकरांची नावे आहेत. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून अधिक तपास जत पोलीस करत आहेत.
काय घडले नेमके?
शहरातील विठ्ठलनगर परिसरातील आदाटे वस्ती नजीक चंद्रकांत माने हे आई, वडील ,पत्नी व मुलासह शेतात राहतात. दुपारी ३ वाजताच्या सुमारास पत्नी मिनाक्षी व मुलगा अलोक घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेत तलावात पडले. पोहता येत नसल्याने दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच जत पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
या मायलेकांचे मृतदेह शेत तलावातील पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यानंतर जत ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.